Thursday, June 19, 2025

 शालेय स्तरावर वेबसाईट विकास : डिजिटल साक्षरतेकडे वाटचाल आणि पारदर्शकतेचा मूलमंत्र

    २१व्या शतकात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या झपाट्याने विकासामुळे समाजाचा प्रत्येक घटक डिजिटल होण्याच्या वाटेवर आहे. शाळा म्हणजेच समाजाचे शिक्षणदाते केंद्र, याला यापासून वेगळं ठेवणं शक्यच नाही. त्यामुळेच आजच्या काळात शालेय स्तरावर वेबसाईटचा विकास ही काळाची गरज बनली आहे.

वेबसाईट विकास – शाळेची डिजिटल ओळख

    शाळेची स्वतःची वेबसाईट म्हणजे त्या संस्थेचा डिजिटल चेहरा. या माध्यमातून शाळा पालक, विद्यार्थी, शिक्षक व समाज यांच्याशी थेट संवाद साधू शकते. शाळेतील घडामोडी, उपक्रम, निकाल, प्रवेश प्रक्रिया, शिक्षकांची माहिती इत्यादी गोष्टी वेबसाईटवर प्रदर्शित करून शाळा अधिक खुली व पारदर्शक बनते.

डिजिटल साक्षरता – विद्यार्थ्यांना सक्षम बनवणारी शक्ती

    वेबसाईट तयार करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग देणे, त्यांना HTML, CSS, वेबसाईट मॅनेजमेंटसारखे प्राथमिक ज्ञान देणे म्हणजेच त्यांच्यात डिजिटल साक्षरता रुजविण्याचा उत्तम मार्ग ठरतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य, आणि आत्मविश्वास वाढतो.

पारदर्शकतेचा मूलमंत्र

    वेबसाईटवर शाळेची माहिती सार्वजनिक केली असता, शाळेच्या कामकाजात पारदर्शकता निर्माण होते. शुल्क रचना, शैक्षणिक कॅलेंडर, शालेय समिती निर्णय, विविध योजना यांची माहिती समाजासमोर ठेवता येते. यामुळे पालकांचा विश्वास वाढतो आणि शाळेची प्रतिष्ठा अधिक दृढ होते.

उपसंहार

    वेबसाईट विकास हा फक्त तांत्रिक उपक्रम नाही, तर तो एक प्रबोधनाचा आणि समावेशकतेचा प्रवास आहे. शालेय स्तरावर वेबसाईट उभारणे म्हणजे विद्यार्थ्यांना डिजिटल युगासाठी सक्षम बनवणे, शिक्षण व्यवस्थेला अधिक उत्तरदायी व पारदर्शक बनवणे आणि शाळेला सर्वसामान्यांशी जोडणं.

    यातूनच तयार होईल एक सशक्त, तंत्रस्नेही आणि विश्वासार्ह शैक्षणिक संस्था – जी काळाच्या पुढे जाईल.


श्री. वाय. एन. गिरासे 

उपशिक्षक 

Saturday, August 3, 2024

शिष्यवृत्ती पुस्तक वाटप

 *डॉ अतुल बडगुजर  शिष्यवृत्ती व  शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तकांचे वाटप* 

दि ३१ जुलै 


पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांलाऔषध कंपनी *मेडीस्पीन तर्फे डॉ अतुल बडगुजर शिष्यवृत्ती दरमहा हजार रुपये दिले जाते.या वर्षी इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी कु कोमल पाटील हीला दिली* .तसेच शिरपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध *डॉ पितांबर दिघोरे यांनी इ 8 वी व 5 वी चा गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच 20 हजार रू किंमतीचे पुस्तके दिलेत* . *शिष्यवृत्ती व पुस्तकांंचे वाटप डॉ पितांबर दिघोरे, डॉ अतुल बडगुजर व मेडीस्पिनचे श्री जयपाल राजपूत यांच्या शुभहस्ते झाले.* कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक श्री के एन काजी होते तर कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री एस आर गवळी, पर्यवेक्षिका सौ जे एस सोनवणे पर्यवेक्षक श्री आर सी पावरा जेष्ठ शिक्षिका श्रीमती एस जी वाडीले, श्री जे जी महाजन श्रीमती जे एन महाजन श्रीमती पी के पाटील श्रीमती पी आर राजपूत उपस्थित होते . विद्यार्थ्यांनी नेहमी स्वप्न मोठे पहावे असे डॉ अतुल बडगुजर यांनी सांगितले.कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी श्री आर पी गावित श्री एच के पाटील ,दिपक जाधव व बबिता धाकडं ताई यांनी केले.प्रास्ताविक श्री वाय एन गिरासे यांनी तर सूत्रसंचालन व आभार श्री एस डी माळी यांनी मानले.

Sunday, January 30, 2022

पांडू बापू माळी विद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न...


 पांडू बापू माळी विद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न...

 भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घडविण्यात मोलाचा सहभाग असणाऱ्या महान विभूतींच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा दिनाचे औचित्य साधून व 30 जानेवारी महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी  दिनानिमित्त शहरातील *पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर* येथे शालेय स्तरावर विविध कार्यक्रम घेण्यात आले. 

सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याकरिता *स्व. तपनभाई पटेल मेमोरियल डिजिटल हॉल येथे विद्यालयाचे प्राचार्य श्री. के. पी. कुलकर्णी सर व उपस्थित मान्यवर यांनी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले*

 त्यानंतर ठीक 11 : 00 वाजता सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर वृंद यांनी 2 मिनिटापर्यंत मौन धारण करून स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना व महात्मा गांधीजी यांना आदरांजली वाहिली. 

त्यानंतर विद्यालयातील गितमंच च्या विद्यार्थिनींनी आपल्या मधुर वाणीतुन महात्मा गांधी यांचे आवडते 'भजन वैष्णव जन तो.....'  गायले, यासाठी श्रीमती जे. एन. महाजन मॅडम यांनी परिश्रम घेतले. 

यावेळी कार्यक्रमास शाळेचे  जेष्ठ पर्यवेक्षक श्री.एम .एम.बैसाणे सर , श्री. एस. आर. गवळी सर,  कार्यालयीन अधिक्षक श्री. जे. बी. जाधव भाऊसाहेब,  ज्येष्ठ शिक्षिका सौ. जे.एस.सोनवणे मॅडम व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयातील सर्व  उपस्थित व विद्यार्थ्यांनी शालेय पटांगण स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच विद्यालयातील शिक्षिका भगिनींनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरोना संक्रमणाचे उपाय, वसुंधरा वाचवा, पाणी वाचवा तसेच सर्व धर्म समभाव व स्वच्छतेचा संदेश देणारी भली मोठी सुंदर अशी रांगोळी साकारून महात्मा गांधीजी यांना आदरांजली वाहीली. यासाठी कला शिक्षिका श्रीमती एस. एस. वसावे मॅडम, श्रीमती एम.पी. चव्हाण मॅडम, श्रीमती एम.एन.जैन. मॅडम, श्रीमती एस.व्ही. सिसोदे मॅडम, यांनी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. पी. राठोड सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.बी. ए. मोरे सर, श्री. एच.के. पाटील, सर, जे. जी. महाजन सर,श्रीमती जे. एन. महाजन मॅडम, श्रीमती एस.एस. वसावे मॅडम, श्रीमती एम.पी. चव्हाण मॅडम, श्रीमती एम. एन.जैन मॅडम, श्रीमती एस. व्ही. सिसोदे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी मोलाचे सहकार्य केले.




Monday, January 3, 2022

क्रांतिज्योती सावित्रीईबाई फुले जयंती

 *विनम्र अभिवादन..* 

*देशातील आद्य स्त्री शिक्षिका..*

*देशातील आद्य* *मुख्याध्यापिका..*

*प्रतिभावंत कवयित्री..*

*समस्त स्त्री वर्गाला गुलामीच्या बंधनातून मुक्त करणाऱ्या मुक्तिदात्या..*

*थोर समाज सुधारक..*

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..*🙏🙏💐🙏🙏💐🙏🙏💐🙏🙏


*3 जानेवारी 18 31 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या छोट्याशा खेड्यात खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी एक स्त्री रत्न जन्मास आले.*


*सिद्धूजी ,सखाराम ,श्रीपती अशा तीन भावंडांची एकुलती एक बहीण म्हणजे क्रांतीज्योती सावित्री..*


*मुलगी झाली म्हणून गावभर साखर वाटप करणारे खंडोजी नेवसे पाटील हे एक आदर्श वडील क्रांतीज्योती सावित्री यांना लाभले हे त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल..*


*याकाळात समाजामध्ये अनेक वाईट चालीरीती रूढी परंपरा समाजात सर्व मान्य होत्या. त्यापैकी बालविवाह, सतीची चाल केशवपन अशा अनेक रूढी परंपरांनी स्त्रियांना तुच्छतेची वागणूक दिली होती.*


*क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी गोविंदराव फुले यांचे सुपुत्र ज्योतिराव फुले यांच्याशी सन 18 40 मध्ये झाला.*


*क्रांतीज्योती सावित्रीबाई ह्या सुरुवातीस निरक्षर होत्या परंतु ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना लिहा-वाचायला लावले त्यांना साक्षर बनविले एवढेच नव्हे तर त्यांना ट्रेनिंग देऊन देशातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका बनविले.*


*सावित्रीबाई फुले यांच्यासोबतच ज्योती रावांची मावस बहीण सगुणाबाई ह्या सुद्धा शिक्षित झाल्या.*


*ज्योतिरावांनी शिक्षणाचे महत्त्व पूर्णपणे ओळखले होते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे.*

*विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले.*

*अशा मार्मिक शब्दांमध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी विद्येचे महत्त्व प्रतिपादन केले आहे.*


*1 जानेवारी 18 48 रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली.*


*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दररोज मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळेत पायी पायी चालत जात.*

*वाटेने जात असताना काही कर्मठ सनातनी वृत्तीचे माणसे सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर चिखल, माती, शेण, दगड,धोंडे फेकत.*

*परंतु सावित्रीबाई फुले काही डगमगल्या नाहीत त्यांनी मुलींना शिकविण्याचे व्रत अखंडपणे चालूच ठेवले.*


*सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत जोतीरावांच्या मित्रमंडळी पैकी असणाऱ्या सहा मुलींनी प्रवेश घेतला.*

*१. अन्नपूर्णा जोशी वय पाच वर्ष*

*२. सुमती मोकाशी वय चार वर्ष*

*३. दुर्गा देशमुख वय सहा वर्ष*

*४. माधवी थत्ते वय सहा वर्ष*

*५. सोनू पवार वय चार वर्ष*

*६. जनी कर्डीले वय पाच वर्ष*

*अशा फक्त सहा मुली सुरुवातीला शाळेत दाखल झाल्या होत्या.*

*या सहा मुलींपैकी चार मुली ब्राह्मण समाजातील होत्या. एक मुलगी मराठा समाजातील तर एक मुलगी धनगर समाजातील होती.*


*पेशव्यांची राजधानी असणाऱ्या पुण्यामध्ये आता सर्वत्र धर्म बुडणार..! संस्कृती लयाला जाणार..! घोर कलियुग आले आहे..! अशा नाना तर्‍हेने सनातन्यांनी मुलींच्या शाळेला विरोध करायला सुरुवात केली.*


*काही धर्ममार्तंडांनी आणि कर्मठ सनातन्यांनी गोविंदराव फुले यांचे कान भरले आणि ज्योतिरावांनी व सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणापासून प्रवृत्त व्हावे अन्यथा समाज फुले कुटुंबियांना धर्म बहिष्कृत करेन अशी धमकी गोविंद रावांना दिल्यामुळे गोविंदरावांनी ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना निर्वाणीचे सांगितले की तुम्ही मुलींना शिकविण्याचे काम सोडून द्या.*


*महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे तोपर्यंत मी मी अंगीकारलेले व्रत सोडणार नाही. असे म्हणून ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे वडिलांचे घर सोडून दुसरीकडे गेले.*


*महात्मा ज्योतीराव फुले यांचे बाल सवंगडी उस्मान शेख यांनी जोतिराव आणि सावित्रीबाईंना आपल्या घरी नेले. त्यांच्या संसारासाठी भांडीकुंडी दिली.*


*जगाच्या दुःखाचे कारण आणि दुःखाचा विनाश करण्यासाठी राज पदाचा त्याग करणारा राजपुत्र सिद्धार्थ गौतम आणि समस्त स्त्री वर्गाच्या उद्धारासाठी घरादाराचा त्याग करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले हे महान रत्न याच मातीत जन्माला आली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.*


*अल्पावधीतच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नातून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात वीस ते पंचवीस शाळा सुरू झाल्या.*


*पाहता पाहता पुण्यातील शिक्षणाची चर्चा इंग्लंड पर्यंत पोहोचली.*

*इंग्लंडच्या महाराणीचा आदेशाला शिक्षणाचे महान कार्य करणाऱ्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा यथोचित सत्कार करण्यात यावा.*

*राणी साहेबांच्या आदेशावरून पुण्याचे कलेक्टर मेजर कॅन्डी यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग वाड्यात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा गौरव करण्यात आला.*

*16 नोव्हेंबर 18 52 या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा उचित गौरव व्हावा म्हणून तत्कालीन सरकारने त्यांचा जंगी सत्कार आयोजीत केला.*

*या सत्काराला पुण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.*


*या सत्कार प्रसंगी 193 रुपयांच्या दोन शाली महावस्त्र म्हणून सरकारच्या वतीने ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना प्रदान करण्यात आल्या.*

*जोतिरावांच्या संस्थेच्या शाळा ची दुसरी वार्षिक परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी 18 53 रोजी घेण्यात आली.*

*सायंकाळी चार वाजता सुरू झालेल्या या परीक्षेसाठी 237 विद्यार्थ्यांनी परीक्षा देत होत्या ही परीक्षा पाहण्यासाठी पुनाकॉलेजच्या विद्यार्थ्यांसह प्रतिष्ठित मंडळी आणि बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.*

*याप्रसंगी विद्यार्थिनींना कार्यक्रमाच्या अध्यक्ष विशेष जोन्स यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले*


*याप्रसंगी बक्षीस स्वीकारताना एका चिमूरड्या मुलीने साड्या पुस्तकाचे बक्षीस न देता आम्हाला शाळेसाठी ग्रंथालय द्या अशी स्पष्ट सूचना केली आणि ही सूचना ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी अमलात आणली.*

*शालेय ग्रंथालयाच्या योजनेची ही सूचना माइल स्टोन ठरली आहे.*


*महिला सेवा मंडळ नावाची एक संस्था याच सुमारास सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केली.*

*या मंडळाच्या सचिव सावित्रीबाई फुले होत्या तर अध्यक्षा पुण्याचे कलेक्टर जोन्स यांच्या पत्नी मिसेस जोन्स ह्या होत्या.*


*सन 18 63 साली ज्योतिरावांनी आपल्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.*

*या बालहत्या प्रतिबंधक गृह आत शंभराहून अधिक महिलांची बाळंतपण सावित्रीबाईंनी मोठ्या आनंदाने केली.*

*याच बालसुधारगृहातील काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंत ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतला आणि त्याला शिकून डॉक्टर केले.*


*सन 18 68 मध्ये ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी आपल्या अंगणातील पाण्याची विहीर अस्पृश्य बंधू-भगिनींना साठी खुली केली.*


*दिनांक 24 सप्टेंबर 18 73 ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.*


*जुलै 18 87 च्या सुमारास महात्मा ज्योतिराव फुले पक्षाघाताने आजारी पडले.*


*सावित्रीबाई फुले यांच्यावर काळाने आघात केला आणि 28 नोव्हेंबर 18 90 रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे निर्वाण झाले.*

*सावित्रीबाई मोठ्या धीरोदात्तपणे आल्या प्रसंगाला सामोरे गेल्या.*

*सत्यशोधक समाजाचे आणि उर्वरित महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्याची धुरा सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर वाहिली.*


*सन अठराशे 96 मध्ये पुण्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला.*

*दुष्काळा पाठोपाठ सण 18 97 यावर्षी पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातले.*

*साथीच्या रोगाने माणसे पटापट मरु लागली.*


*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपला मुलगा डॉक्टर यशवंत याला नगर वरून पुण्याला बोलावून घेतले आणि साथीच्या हजाराच्या काळात ससाणे यांच्या माळावर प्लेगच्या रुग्णांसाठी दवाखाना सुरू करायला लावला.*


*हॉंगकॉंग बंदरातून मुंबई बंदर व्हाया पुणे असा सण 18 97 च्या आरंभाला आगमन झालेला प्लेग पुण्यामध्ये थैमान घालू लागला.*

*प्लेग हा संसर्गजन्य आजार आहे हे माहीत असतानाही त्या माऊलीच्या ममतेने रोग्यांसाठी कार्य करत राहिल्या.*


*सावित्रीबाई फुले ह्या स्वतः प्लेगचा रुग्णाची सेवा करू लागल्या.*


*मुंढवा गावातील अस्पृश्य बालरुग्ण पांडुरंग बाबाजी गायकवाड यास लेकच्या दवाखान्यात नेत असताना सावित्रीबाई फुले यांना प्लेग या महाभयंकर साथीच्या रोगाची लागण झाली.*

*दिनांक 10 मार्च 18 97 रोजी सावित्रीबाई फुले यांचे प्लेगच्या आजाराने निधन झाले.*


*सतत पन्नास वर्ष लोकसेवेचे व्रत करणारी ही ममताळू माउली आता काळाच्या उदरात विसावली . ज्योतीरावांची ज्योत आनंतांची माता आता अनंतात विलीन झाली.*


*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा..*


*वाचे उच्चारी तैसा क्रिया करी*

*तीच नरनारी पूजनीय*

*सेवा परमार्थ पाळी व्रत सार्थ*

*होई कृतार्थ तेच वंद्य*

*सुख-दुःख काही स्वार्थ पणा नाही*

*परहित पाही तोच थोर*

*मानवाचे नाते ओळखती जे ते*

*सावित्री वंदते तेच संत..*


*जय ज्योती जय सावित्री जय क्रांती..*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✍️👆

Sunday, August 15, 2021



 *माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शाळेविषयी ऋण*

शिरपूर:पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात  साजरा करण्यात आला. शिक्षण समिती सभापती सौ.रेखा ताई सोनार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विद्यालयाचे १९६६- ६७ वर्षाचे माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला नगराध्यक्ष सौ जयश्री बेन पटेल यांच्या शुभहस्ते झेरॉक्स मशीन भेट म्हणून दिले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ संगीता ताई देवरे यांच्या हस्ते विद्यालयाचे माजी शिक्षक श्री एस डी गिरासे,जे टी ईशी,ना. सु. चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष श्री प्रभाकर राव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, नगरसेविका सौ.अरूणा थोरात,सौ.मोनिका शेटे,शेख नाजीराबी ,श्री किरण धाकड, मिर्झा इरफान बेग,माजी उपनगराध्यक्ष श्री गोकुळ सिंह राजपूत,श्री नरेंद्र जैन, डॉ सुभाष भंडारी, श्रीलक्ष्मीचंद अग्रवाल श्री नंदू अग्रवाल श्री नारायण स्वर्गे श्री वसंतभाई गुजराथी श्री मोतीलाल शर्मा श्री उदयसिंग चौधरी सौ.सुवर्णा शहा सौ. प्रमिला भंडारी, मुख्याध्यापक के पी कुलकर्णी उपमुख्याध्यापक ए एस कानडे पर्यवेक्षक के एन काजी एम एम बैसाणे एस आर गवळी अधिक्षक जे बी जाधव श्री बी एस राजपूत,श्री आर जी कोळी श्री एस बी पवार हे उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर सुभाष भंडारी नरेंद्र जैन व जे टी ईशी यांनी शाळेविषयी आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.श्री प्रभाकर चव्हाण यांनी माजी विद्यार्थ्यांचे शाळेला भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री आर सी पावरा श्री के के पावरा श्री बी ए मोरे, श्री डी एच राजपूत, श्री निलेश गुजर श्री जे जी महाजन, श्रीमती एम पी चव्हाण, श्रीमती जे एन महाजन श्रीमती पी के पाटील श्री शशी माळी, दिपक जाधव,भीमा माथने, प्रफुल्ल मराठे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस व्ही गिरासे व वाय एन गिरासे यांनी केले

Friday, August 13, 2021

सेतू अभ्यास चाचणी क्र.३

 सेतू अभ्यास चाचणी क्र ३ सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा .....!

सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा .

इयत्ता ५ वी साठी - येथे क्लिक करा.

इयत्ता ६ वी साठी - येथे क्लिक करा.

इयत्ता ७ वी साठी - येथे क्लिक करा.

इयत्ता ८ वी साठी - येथे क्लिक करा.

इयत्ता ९ वी साठी - येथे क्लिक करा.

इयत्ता १० वी साठी - येथे क्लिक करा.

Monday, August 9, 2021

कै पांडू बापू माळी यांची 62 वी पुण्यतिथी साजरी

 

कै. पांडू बापू माळी यांची पुण्यतिथी साजरी

शिरपूर येथील पांडू बापू माळी मुन्सिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यालयाचे आश्रयदाते कै. पांडू बापू माळी यांची 62 वी पुण्यतिथि 9 ऑगस्ट 2021 रोजी कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नगराध्यक्ष रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण हे होते तर कार्यक्रमाला शिक्षणसमिती सभापती सो.रेखाताई सोनार, शिरपूर मर्चंड बॅकेचे चेअरमन प्रसन्न जैन, गोविंदा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री डिगंबर माळी,प्रतिष्ठीत व्यापारी गोकुळ सिंग राजपूत,डाॅ मनोज महाजन, मुख्याध्यापक श्री के पी कुलकर्णी उपमुख्याध्यापक श्री ए एस कानडे, पर्यवेक्षक श्री के एन काजी श्री एम एम बैसाणे श्री एस आर गवळी अधिक्षक श्री जे बी जाधव , श्रीमती जे एस सोनवणे श्रीमती एस जी वाडीले,श्री एस एस पावरा,श्री ए एफ पावरा,श्रीमती जे एन महाजन, श्रीमती एम पी चव्हाण श्री टि पी गुजर श्री ए जी तेले श्री ए एच कोळी श्री व्ही पी सोनवणे,श्री बी एस राजपूत श्री बी एस धनगर श्री एन एन पाटील श्री,एस बी पवार,पी बी वारुळे हे उपस्थित होते.मान्यवरांचा शूभहस्ते प्रतिमा व पुतळा पुजन झाले . मान्यवरांनी आपल्या भाषणातून कै.पांडू बापू माळी यांचा कार्याला उजाळा दिला.

यावेळी मान्यवरांनी विद्यालयात श्री जे जी महाजन यांच्या प्रयत्नातून हरित सेने मार्फत शाळा सुशोभीकरण साठी लावण्यात आलेल्या शोभेचा झाडांची पाहणी केली.कार्यक्रमाचा यशिस्वतेसाठी श्री बी ए मोरे, श्री एच एम माळी, श्री ए ए पाटील, श्री एच के पाटील,श्री एस एस धाकड,श्री ए के गुजर ,श्री वाय एन गिरासे,जितू जाधव, भीमा माथने प्रफुल मराठे यांनी परिश्रम घेतले.