*कै. दादासाहेब पांडू बापू माळी पुण्यतिथी निमित्त....विशेष लेख*
आज दादासो पांडू बापू माळी यांची पुण्यतिथी त्यांना अभिवादन करण्याचा व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा दिवस.
कै. दादासो. पांडू बापू माळी यांचा जन्म सन १९१०च्या सुमारास खान्देशातील पाळधी ता.एरोडल जि.जळगाव सारख्या लहानश्या गावात अठराविश्वे दारिद्रय नांदत असलेल्या कुटुंबात झाला. घरात कमालीचे दारिद्रय, दोन वेळचे पोट भरण्याची भ्रांत, समोर स्पष्ट दिसणारे अंधकारमय भविष्य पाहून दादा मोठया अपेक्षेने शिरपूरला आपल्या मामांकडे आले. मामांची आर्थिक परिस्थितीही तशी बेताचीच पण 'अतिथी देवो भव' हा विचार सांगणारी आपली संस्कृती आणि अशा या संस्कृतीचा कित्ता गिरवणारे दादासाहेबांचे मामा. दादांच्या पडत्या काळात त्यांच्या मामांनी मदतीचा हात पुढे केला नवे त्यांना आधारही दिला.
शिरपूरला मामांकडे आल्यावर दादांनी आपला भार त्यांच्यावर न टाकता एका किराणा दुकानात काम करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला. किराणा दुकानावर काम करतांना पुड्या बांधण्यापासून तर पोती उचलण्यापर्यंत सर्व प्रकारची कामे दादांनी केली. 'कोणतेही काम तुच्छ नाही' हा म. गांधींचा विचार दादांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीत उतरवाला. दादांची आपल्या कामावर निष्ठा होती, श्रमचोरी त्यांना मान्य नव्हतीच. त्यामुळे दादा जरी एखाद्या दुकानावर काम करत असले तरी ग्राहकांना मात्र ते दुकान दादांच्याच मालकीचे वाटत असे.
दादांनी आपल्या व्यवसायाशी इमान राखले. दुकानावर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची फसवणूक त्यांनी कधीच केली नाही. किंबहुना असा विचारही त्यांना कधी शिवला नाही. कामावरील निष्ठा, सचोटी, प्रचंड आत्मविश्वास , व्यवसायातले कौशल्य व मामांचे मार्गदर्शन याच भांडवलावर स्वतंत्र व्यवसायाची दादांनी पायाभरणी केली व पाहता-पाहता ते नामांकित व्यापाऱ्यांच्या पंक्तीत जावून बसले.
उद्योगाचे घरी, लक्ष्मी पाणी भरी' या उक्तीप्रमाणे दादांच्या घरी श्रीमंती नांदू लागली. व्यवसायात भरभराट झाल्यावर, घरात लक्ष्मीचा वावर होऊ लागल्यावर, समाजात पत आणि प्रतिष्ठा मिळाल्यावर देखील या वैभवाचा आणि श्रीमंतीचा वास कधी त्यांनी आपल्या अंगाला येवू दिला नाही.
असा हा जन्मभर श्रमाची साधना करणारा श्रमदेवतेचा पुजारी, दानशूर आणि मोठ्या दिलाच्या उद्योगपतीने "श्रावण शुद्ध प्रतिपदा सन-१९६०" रोजी जगाचा निरोप घेतला.
दादांचा हाच समाजसेवेचा व कार्याचा वसा त्यांचे सुपुत्र आदरणीय डिगंबर भाऊ आणि भटूभाऊ माळी यांनी अविरतपणे तेवढयाच जोमाने व जिद्दीने पुढे सुरु ठेवला.
सन १९६०च्या सुमारास शिरपूर वरवाडे नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती. शाळेची इमारत सुधारणेसाठीही पैसा नव्हता. परंतू अशा परिस्थितीतही समाजातील गरजू व गुणी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा, त्यापासून कोणीही वंचित राहू नये असा विचार शि.व.न.प चे तत्कालीन नगराध्यक्ष कै. प्रल्हादराव तात्यांचा होता. त्यासाठी शाळेला आर्थिक आधाराची गरज होती. अशा परिस्थितीत दादांचे थोरले सुपुत्र आदरणीय डिगंबर पांडू माळी( डिगंबर भाऊ) यांनी रुपये-२१०००(एकवीस हजारांची) भरघोस देणगी देऊन या शाळेला मोठा आर्थिक आधार दिला. ज्यामुळे म्युनिसिपल हायस्कूलरूपी इवलासा वेलू गगणावरी जावू शकला, नव्हे तर आज त्याचा वटवृक्ष होऊ शकला. तेव्हापासूनच या शाळेला पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल हे नाव देण्यात आले.
आश्रयदाते आदरणीय डिगंबर भाऊ , कै. प्रल्हादराव तात्याच्या आशीर्वादाने तसेच शिपूरचे भाग्यविधाते आदरणीय श्री.अमरीशभाई पटेल व आदरणीय भुपेशभाई पटेल यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आमच्या या शाळेने अनेक पिढ्या घडविल्या नव्हे तर आजही शाळा उत्तरोत्तर प्रगती करत आहे.
आजच्या या दिवशी स्वावलंबन, जिद्द, चिकाटी, सचोटी व कष्ट यासारखे दादासाहेबांचे गुण, त्यांचे विचार आत्मसाद करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करणे हीच त्यांच्या पुण्यस्मरणच्या निमित्ताने त्यांना खरीखुरी श्रद्धांजली व आदरांजली ठरेल.
*पुण्यत्म्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.*
मुख्याध्यापक,
शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद
*पी.बी.एम. परिवार, शिरपूर*
प्रा. पी.डी.पाटील जे.जी.महाजन
(उपशिक्षक) (उपशिक्षक)



No comments:
Post a Comment