Monday, June 1, 2020

दोन शब्द आठवणींचे..........

शालेय परिवारातील 31 मे 2020 रोजी निवृत्त मान्यवरांनी शब्दांनी गुंफल्या आपल्या आठवणी....
मी स्वत: श्री.राजाराम एकनाथ वानखेडे आपल्या पांडू बापू माळी म्युनि.हायस्कूल मध्ये ८ डिसेंबर १९८७ रोजी मा.शिक्षक पदावर रुजू झालो.तेव्हा श्री.आर एम अग्रवाल सर मुख्याध्यापक म्हणून नुकतेच सेवामुक्त होऊन श्री.ई.सु.बि-हाडे सर प्रभारी मुख्या.म्हणून कार्यरत होते.कि.वि.प्रसारक संस्थेच्या दोन विद्यालयांच्या तुलनेने  आपली शाळा शिरपूर शहरात नावारुपाला होती.विद्यार्थ्याना इ.५वी. ते १२वी पर्यंतच्या प्रवेशासाठी  नगराध्याक्ष व नगरसेवकांचे लेटर आणावे लागत असे.तर शिक्षक व इतर पदाच्या नोकरीचे तर फारच जिकिरिचे काम होते.सुरुवाती पासूनच प्रत्येक वर्गाच्या ८-८व ९-९तुकड्या होत्या. व शिक्षक व कर्मचा-यांचीही भरती रोस्टर प्रमाणे होत असे. शिक्षक वर्गही अभ्यासू व खूप मेहणती होता ,तसेच आदरही तितकाच होता.म्हणून पालक वर्ग पाल्यासाठी निश्चिंत असायचा.तसेच विद्यार्थी सुद्धा खूपच मेहनती व कष्टाळू होता.शाळेचे अनेक विद्यार्थी  देश विदेशात डाँक्टर,इंजिनिअर,वकिल,शिक्षक,प्राध्यापक,व्यापारी,उद्योगपती,कलाकार म्हणून काम करत आहेत. तसेच शाळेत विविध सांस्क्रुतीक कार्यक्रम,राष्ट्रीय कार्यक्रम अगदी बहारदार होत असत.अशा रितीने पांडू बापू माळी म्युनि.हायस्कूल ही आपली शाळा आजही नगरपालिकेची असून सुद्धा नावारूपाला आहे. नगर पालीकेची परिस्थिती मा.भाईसाहेब व त्यांचे बंधू यांच्या मुळे एक भव्य तीनमजली ईमारत थाटात विद्यार्थी रुपी फूलांनी बहरत आहे.अशा रितीने सन.१९८७ पासून ते २०२० पर्यंत माझ्या ३२ वर्ष ६महिन्याच्या सेवा कालावधित माझी ही  शाळा सतत बहरत आहे व यापुठेही अशीच बहरत राहो ही प्रभुचरणी प्रार्थना.धन्यवाद......
कृपाभिलाषी
श्री.आर.इ.वानखेडे


सौ.एल.पी.अहिरे


अशी माझी शाळा

काय सांगू बाई
कशी माझी शाळा
जो तो येऊन रमतो
अशी माझी पी. बी. एम. शाळा ||१||
ओढ लावी जीवास
पुरी करते आस
सुसंस्काराची देई शिदोरी 
आपुल्या लेकरांस ||२||
या या बाळांनो 
सारे सारे या
झटू एक होऊन 
पांग तिचे फेडाया ||३||
शाळा असे आपुली 
बहु प्रशस्त 
ज्योत पेटवण्या दिव्यत्वाची
करू या शिकस्त ||४|| 
पालकांनो नका विसरू
असतं जुनं ते सोनं
म्हणूनी विनविते शिकवा इथं
मुलांना मोठ्या अभिमानानं ||५||
काय सांगू बाई....

अशी माझी आवडती शाळा! आज मला तिचा निरोप घ्यावा लागतो आहे. होय. आज दि. ३१/५/२०२० रोजी मी सेवा-निवृत्त होत आहे; आणि म्हणून माझे मन भरून आले आहे.

दि. ११/९/१९८२ रोजी मी पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूलमध्ये रुजू झाले. जवळ-जवळ ३८ वर्षे प्रदीर्घ सेवा करत असताना मला या शाळेने खूप जपले, घडवले आणि माझ्याकडून हजारो विद्यार्थी घडवून घेतले.

काळाच्या गतीने चालणाऱ्या माझ्या शाळेचं तेव्हाचं चंद्रमौळी रूप म्हणजे नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिने घालून नटलेली सोज्वळ स्त्रीच जणू!

हिरव्यागार झाडांनी आणि कौलारू छपरांच्या विविध प्रशस्त दालनांनी सजलेली ती शाळा आणि आजच्या काळातील नवा पण अंगभर साज ल्यालेली रूपवती असलेली माझी शाळा, तीन मजली भव्य आणि दिव्य अशी आधुनिक साज घेऊन म्हणजे संगणक कक्ष, स्मार्ट बोर्ड, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र प्रयोगशाळा अशी विज्ञान आणि तंत्रज्ञानाने नटलेली शाळा आम्हाला वंदनीय आणि पूजनीय आहे.

या शाळेचे वेळोवेळी आधुनिकीकरण करणारे आमचे शिरपूरचे भाग्यविधाते मा. अमरिशभाई, मा. भूपेशभाई आणि मा. नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा या शाळेवर विशेष लोभ आहे. या शाळेचा नाव-लौकिक वाढवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

माझ्या शाळेचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्य जोपासणारं पीर-बाबाचं ठाणं आणि मरी-आईचं देऊळ. सर्वधर्मसमभावाचं बाळकडूच प्रत्यक्ष कृतीद्वारे आम्हा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना या शाळेने पाजलं आहे.

सबके लिये खुला है मंदिर ये हमारा! हे ब्रीदवाक्य अंगीकारून सर्व थरातील आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना स्वीकारून, त्यांना प्रवेश देऊन शिक्षण हा एक अनमोल दागिना आहे! स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! सागर देतो माणिक मोती, शाळा देते ज्ञानज्योती! इ. सुविचारयुक्त बोलक्या भिंतीनी विद्यार्थ्यांना रममाण करण्याचे काम माझी शाळा नेहमी करत असते.

११० वर्षांचा इतिहास असलेली माझी शाळा संपूर्ण धुळे जिल्ह्यातील नावाजलेली म्युनिपालटीची शाळा आहे. हिचा वैभवशाली इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. आजतागायत या शाळेला बुद्धिमान, कार्यक्षम आणि सेवाभावी असे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी लाभले; ज्यांनी शाळेचा नाव-लौकिक वाढवला. हजारो विद्यार्थी या शाळेतून शिकून गुणवत्ता यादीत स्थान पटकावून बाहेर पडले आहेत. देश-विदेशात मोठमोठी पदे भूषवित आहेत आणि यशस्वी तसेच समाधानी जीवन जगत आहेत; ते या शाळेतील शिक्षकवृंदांच्या सुसंस्कारामुळेच. आजही कुठेही गेलं तरी पी. बी. एम. शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक आपला वेगळा ठसा उमटवल्याशिवाय राहत नाहीत.

एकेकाळी माझ्या या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी पहाटे ३/४ वाजेपासून पालक नंबर लावून रांगेत उभे राहत असत. दुसऱ्या दिवशी दुपारीसच Admission Full चा बोर्ड लागत असे. पालक कोणाची तरी ओळख दाखवून, वशिला लावून प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करत असत. पण आज परिस्थिती थोडी बदलली आहे. आज विद्यार्थी शोधत फिरावे लागते; कारण शहरात आणि खेडोपाडी शाळा उघडल्या आहेत म्हणून विद्यार्थी संख्या रोडावली आहे. पण तरी देखील माझ्या शाळेत साडेतीन हजारच्या आसपास विद्यार्थी असतातच.

शाळेत होणारे विविध क्रीडा सामने असोत, विज्ञान प्रदर्शन असो किंवा विविध स्पर्धा, परीक्षा असोत किंवा वर्षातून होणारं स्नेहसंमेलन असो, सर्वांमध्ये मोठ्या हिरीरीने सहभाग घेऊन पुढे जाण्याची विद्यार्थ्यांमध्ये असलेली चढा-ओढ पाहून जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. वर्षभरातील हे सर्व विविध कार्यक्रम आणि शिक्षकांनी केलेलं अध्यापन याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. अशा रीतीने माझी शाळा ही सर्वांगाने फुलते, बहरते आणि विकसित होत असते. ही आंतरक्रिया सतत, अविरत सुरु असते.

आताच कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात इ. ८ वी ‘ग’ मधील संजीत राजपूत या आमच्या बाल-शास्त्रज्ञाने घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून ‘मिनी मिक्सर” आणि “सॅनिटायझर” तयार करून सादर केलं. आम्हा सर्वांना आणि माझ्या शाळेला त्याचा खूप खूप अभिमान वाटला.

असं आहे माझ्या शाळेचं कार्य-कर्तृत्व! 
मग सांगा का नाही अभिमान वाटणार माझ्या शाळेचा?

अशा या बहुगुणी शाळेचा आणि माझ्या सर्व बाल-गोपाळांचा, आपल्या कल-कलाटाने शाळेला सजीव करणाऱ्या चिमण्या पाखरांचा निरोप घेऊन, त्यांना सोडून घरी बसण्याची कल्पनाच मला सहन होत नाहीये. जवजवळ ४० वर्षे त्यांच्यातच काढल्यानंतर आता माझा दिवस कसा जाईल? मुलांचे ते गोड, निरागस, हसरे चेहरे, त्यांच्या खोड्या, त्यांच्या वागणुकीतून दिसणारी आज्ञाधारकता तर कधी कधी दिसणारी बेडर वृत्ती या सगळ्यांची खूप सवय झाली आहे.

हे शाळामाते, आजपर्यंत तू सांभाळलंस, जपलंस तसंच यापुढेही तुझ्याशिवाय आणि या चिमण्या पाखरांशिवाय जगण्याच बळ दे! शक्ती दे!! हिम्मत दे!!!


सौ. अहिरे एल. पी.
सेवानिवृत्त शिक्षिका,
पां. बा. मा. म्युनिसिपल
हायस्कूल शिरपूर
३१/५/२०२०


श्री के.बी.सुशीर
*सेवानिवृत्ती..*
                *निरोपाचा क्षण...*
     मी *श्री. के. बी. सुशिर* सर *दि.३१.०५.२०२०* रोजी पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कुल *तांत्रिक विभाग*, शिरपूर येथून *३८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतुन सेवानिवृत्त होत आहे..*
       या सेवेच्या कालावधी मध्ये मला माझ्या सर्व सहकारी कर्मचारी बंधू व भगिनी तसेच सर्व सहकारी अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले..
     *तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो..*
     या सेवा कार्यकाळात माझ्या कडुन अनावधानाने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला आपण उदार अंतकरणाने माफ करा..
     शेवटी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.. आपल्या सर्व प्रेमळ, अम्रुततुल्य गोड आठवणी मी माझ्या सोबत घेऊन जात आहे.
     *धन्यवाद !!*
         🙏
     *आपला नम्र*
*श्री. के. बी. सुशिर*
    तांत्रिक विभाग
         शिरपूर


No comments:

Post a Comment