१८ जुलै १९६९
साहित्यसम्राट, लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे
स्मृतिदिन........
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
स्वत:च्या दु:खांचा विचार न करता, आपले विचार, आपले कार्य व प्रतिभा जनसामान्य लोकांपर्यंत पोहचविणारे व लोककलेला प्रतिष्ठा मिळवुन देणारे आणि गरिबांच्या व वंचितांच्या व्यथा प्रभावी व प्रखरपणे मांडणारे लोकशाहीर, भीमशाहीर व शिवशाहीर अण्णा भाऊ साठे.
शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या व जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक विद्वान व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमचे अण्णाभाऊ साठे.
समाजातील दलित शोषित जनतेने जात-पात, धर्म, मान-पान यांचा त्याग करावा व एक समतेवर आधारीत समाज निर्माण करण्यात पुढाकार घ्यावा असे अण्णाभाऊंना प्रकर्षाने वाटत होते.
अण्णाभाऊंनी विविध साहित्य प्रकार हाताळले. कथा, कादंब-या, पोवाडे, लावण्या, लोकनाटय़े, पदे, गीते अशी विविध क्षेत्रे त्यांनी सहजगत्या पादाक्रांत केली. आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती, प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले. शब्दांना अंगाराचे रूप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला चेतवत अण्णाभाऊ मराठी साहित्यातील अढळ पदावर विराजमान झाले आहेत.
अण्णाभाऊ साठेचं नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही.
अण्णा भाऊंनी आपल्या पुरोगामी-समतावादी, वैज्ञानिक विचारांनी पारंपरिक, पौराणिक तमाशाच्या गण-गवळण ढाच्यातही आमूलाग्र परिवर्तन केले. तमाशाच्या प्रारंभी होणाऱ्या गणेश वंदनालाही त्यांनी फाटा दिला आणि प्रथम वंदू भूचरणा व छत्रपती शिवाजी राजासारख्या शूर पुरुषाला वंदन केले.
थोडक्यात त्यांनी देवाऐवजी माणसाला वंदन करण्याची नवी प्रथा पाडली. तमाशात गवळणींची जी अश्लील भाषेत टिंगल-टवाळी चालायची तिलाही त्यांनी काट दिला. अण्णा भाऊंनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी जलसा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जनप्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या लोकनाट्यातून पुढे नेली. त्यांनी मराठी व भारतीय साहित्य-संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढरपेशी कक्षा रुदावल्या. त्यामुळे अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी, हिंदी, रशियन, फ्रेंच, झेक आदी जागतिक भाषांतही अनुवादित झाले. मराठीतील ज्येष्ठ साहित्यक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णा भाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि ‘महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की’ असा गौरव केला.
अण्णाभाऊंच्या साहित्याचा गौरव महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या जिवंतपणीच केला. पण शासनाने त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला पारितोषिक देण्याशिवाय काहीच केले नाही. अण्णाभाऊंनी कित्येक कथा कादंबऱ्या, गीते, नाटके लिहिली त्यापैकी बरेच साहित्य प्रसिद्ध झालेले असले तरी अजूनही बरेच साहित्य अप्रकाशित आहे किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत या साहित्याचा अतिशय मोलाचा उपयोग झालेला आहे. अण्णाभाऊंचे हे साहित्य जपणे हे शासनाचे तसेच सर्व समाजाचे कर्तव्य आहे. खास करून बहुजन समाजाने हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी विशेष दखल घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. हीच अण्णाभाऊंना त्यांच्या स्मृतिदिना निमित्त खरी श्रद्धांजली ठरेल.
समाजाच्या क्रांतीचा पेटलेला निखारा, अन्याया विरुद्ध बंड पुकारणारे थोर समाजसुधारक ,बहुजन समाजाच्या
कल्याणासाठी पेटलेला झंझावात दिवा, जगविख्यात साहित्यसम्राट ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १८ जुलै १९६९ रोजी प्राण ज्योत मावळली.
त्यांच्या
पावन
स्मृतीस
विनम्र
अभिवादन........
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


No comments:
Post a Comment